दौंड: दौंड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अवकाळी पाऊस पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात कांदा व गव्हाचे उत्पादक जास्त प्रमाणात आहेत. तसेच कलिंगड व टरबूज उत्पादक प्रत्येक गावामध्ये जेमतेम आहेत. मात्र, या उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवकाळी पाऊस झाला, तर मोठा फटका या शेतकर्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कांदा भिजून नुकसान होण्याची शक्यता
तालुक्यातील सर्वच भागात कांदा पीक काढण्याची लगबग सुरू आहे. त्यात काढलेल्या कांद्यासाठी चाळी तयार करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम अनेक शेतकरी करत आहेत. कारण कांद्याचे दर पडल्या असल्याकारणाने कांदा साठवणुकीकडे शेतकरी वळले आहेत. त्यात पावसाच्या वातावरणामुळे साठवणुकीचा खर्चही अचानक वाढला आहे. शेतकऱ्यांपुढे दराचे संकट असताना आता अवकाळी पाऊस झाला तर कांदा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
मळणीयंत्राची मागणी वाढली
रब्बी हंगामातील गहू आणि हरभर्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, अचानक वातावरणात बदल झाल्याने गहू व हरभरा काढणीकडे शेतकऱ्यांचा कल अचानक वाढल्याने मळणीयंत्राची मागणी वाढली आहे. काही शेतकऱ्यांना मळणी यंत्र मिळते तर काही तशेच प्रतीक्षेत आहेत.
कलिंगड, काकडी, टरबूज उत्पादकांना अवकाळी पाऊसची चिंता
तालुक्यातील काही भागांतील शेतकर्यांनी कलिंगड, काकडी, टरबूज आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. यातून शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत होते. मात्र, अचानक ऊन कमी झाल्याने मागणी घटली व याचा बाजारभावावर परिणाम झाला असून पाऊस झालाच तर शेतकर्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
आता हंगाम ऐन भरात असताना अवकाळीची चिंता उत्पादक शेतकर्यांना सतावू लागली आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
यंदा दौंड तालुक्याला अगदी मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतू, दौंड तालुक्यात पिण्यासह शेतीला मुबलक पाणी असले तरीही वातावरणात होणार्या वारंवार बदलामुळे शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे उन्हापासून संरक्षण करत पीक जगवायचे आणि पाऊस पडला तर नुकसान सहन करायचे, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.
मागील आठवड्यात कांदा काढणीला सुरुवात केली असून ऊन मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने मजूर मिळाले नाहीत, त्यात दर ही पडलेले आहेत. म्हणून साठवणूक करणे हाच पर्याय होता. साठवणूक केली आता हे ढगाळ वातावरण झाले आणि साठवणुकीचा (ताढपत्री) मनुष्यबळ यांचा खर्च वाढला. ते करूनही कांदा भिजण्याची भीती अजून कायम आहे.
– गुलाब शेळके, कांदा उत्पादक शेतकरी