युनूस तांबोळी
शिरूर : ‘साहेब, डाळिंबाच्या बागेतली फुलं अन् फळं गेली, हातातोंडाशी आलेली पपई भुईसपाट झाली, द्राक्षेच घट मातीमोल झालं, लिंबा एवढाली गारपीठ झाली, ऊसाची पाने झडली अन् लागवड केलेला कांद्याचे नुकसान झालं. उभं केलेलं भांडवलच नाहीसं होऊन कर्जबाजारी होण्याची वेळ आली. काही करा पण निसर्गाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी पंचनामे करा पण मदत करा’, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. (Damaged farmers)
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते. त्यावेळी नुकसानीची पाहणी करताना नैराश्येच्या तीव्र भावना शेतकऱ्यांमधून येत होत्या.(Dilip walase patil)
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी वळसे पाटील यांनी केली. शिरूर तालुक्यात रविवारी (ता. २६) सायंकाळी वडनेर, सविंदणे, कवठे येमाई, मलठण, माळवाडी, म्हसे, निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी, साबळेवाडी, शिनगरवाडी, ऊचाळेवस्ती, डोंगरगण, तामखरवाडी या भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब, कांदा, गहू, ज्वारी, ऊस इतर रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी दिलीप वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, प्रांताधिकारी हरेष सुळ, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, विस्तार अधिकारी भाऊसाहेब गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, ”महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारी (ता.२६) वादळी पाऊस व गारपीट झाले असून, यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झाले, याचा अंदाज घेऊन याबाबत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू”.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार
तसेच केंद्र सरकार जिरायत व बागायत क्षेत्रासाठी सानुग्रह अनुदान देते. जिरायतसाठी हेक्टरी 850 रूपये, बागायतसाठी हेक्टरी 17 हजार रूपये, फळबागासाठी हेक्टरी 22 हजार रूपये सानुग्रह अनुदान देत असते. प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील काळात काही अनुदान देणे बाकी असेल तर त्याचा देखील पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.