दौंड, (पुणे) : लिंगाळी रोड (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतून रात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका इसमावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 06) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लिंगाळी रोड (ता.दौंड) परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अमोल रामदास कानकाटे (वय 37, रा. उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अंदाजे 4 ब्रास वाळू (किंमत 20 हजार) व वाळू वाहतूक करणारा एक ट्रक (किंमत 10 लाख रुपये) असा 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रकचा मागील क्रमांक नसल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार पंकज देवकाते (वय 28) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 06) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लिंगाळी रोड (ता.दौंड) परिसरात अमोल कानकाटे हा ट्रकने वाळु (रेती) चोरी करून स्वतःच्या फायदयाकरीता गौण खनिजाचे उत्खनन करून त्याच्याजवळ असलेल्या ट्रकमध्ये घेऊन निघाला होता. त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना वाळु या गौण खनिजाचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून ते गौण खनिज चोरी करून त्याच्या ताब्यातील ट्रकमधून घेऊन जाताना लिंगाळी रोडने वाहतुक करीत असताना मिळुन आला. तसेच ट्रकचा मागील क्रमांक नसल्याचेही दिसून आले.
दरम्यान, पोलीस हवालदार पंकज देवकाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बी.एन.एस. कलम 303(2), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 व 15, गौण खनिज कायदा कलम 3 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये करण्यात आली आहे. आरोपीकडे वाळू उत्खनन व वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करत आहेत.