लोणी काळभोर, ता. 10 : झपाट्याने विकसित होणाऱ्या पुणे-सोलापूर महार्गावरील वाहतुक दिवसेंदिवस वाढतच चालली असून हडपसर ते यवत पर्यंत दररोज नोकरी-व्यवसायानिमित्ताने लाखो वाहने धावत असतात. मात्र अपुरा रस्ता, गैरसोयी आणि नियोजनाचा अभाव यामुळे येथील अपघातांसह वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच यंदाच्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या विकासासाठी काही तरतूद होईल ही येथील रहिवाशांची मागणी फोल ठरली असून पुणे-सोलापूर महामार्गाच्या विकासाच्या बाबतीत अर्थसंकल्पाने ठेंगाच दाखवला असल्याची नागरिकांची भावना आहे.
सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे पुणे ते शिरूर 54 किलोमीटर लांबीचा 7 हजार 515 कोटी रुपयांचे उन्नत मार्गाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार असून तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर अंतरावरील चार पदरी उन्नत मार्गाचे काम प्रस्तावित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये अपेक्षित आहेत. मात्र त्यात पुणे-सोलापूर रस्त्याला स्थान दिले नसल्याने येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी मागील महिन्यात मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून खराडी बायपास ते शिरूर एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, यासाठी ते पाठपुरावा करत होते. पुणे-शिरूर रस्त्याचा विकास ही पुण्यासाठी आवश्यक बाब असली आणि स्वागतार्ह असली, तरी आमदार महोदयांचाच मतदार संघ असलेल्या पुणे सोलापूरकडे मात्र त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, आकाशवाणी, भैरोबानाला, पुलगेट चौक, किर्लोस्कर पुल अशा दहाहून अधिक ठिकाणी रोज होताना दिसतेय. मांजरीच्या पुढे असलेल्या कवडीपाट येथील टोलनाका बंद पडला, तरी त्याचा सांगाडा अजूनही बुजगावण्यासारखा तिथंच उभा आहे. तो तातडीने काढून घेण्याची गरज आहे. मात्र त्याकडेही कोणाचेच लक्ष सध्या तरी दिसत नसल्याची भावना येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.