उरुळी कांचन (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी अतुल सुखदेव कोतवाल यांची तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू गणपत कोतवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अष्टापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक चुरशीने लढवत हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप व त्यांचे बंधू यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने 13 विरुद्ध 0 अशी एकतर्फी बाजी मारत विजय मिळवला होता. या निवडणुकीत विरोधकांना मोठ्या फरकाने पराभव करत त्यांनी हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पकड अधोरेखित ठेवली होती.
अष्टापूर सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांना आव्हान देण्याचा प्रयत्न
‘यशवंत’ चे विद्यमान संचालक शामराव कोतवाल, कारखान्याचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीला हवेलीत विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मतदानाअखेर मात्र विरोधकांचा दारुण पराभव झाला होता.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, सुखदेव कोतवाल रामभाऊ कोतवाल, विनायक कोतवाल, लिंबाजी जगताप, बापू जगताप, रामभाऊ कोतवाल, संदीप जगताप, नवनाथ जगताप, उद्धवराव जगताप, विक्रम थोरात, सुरेश कोतवाल, कुंडलिक थोरात, सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल कोतवाल व उपाध्यक्ष अभिमन्यू कोतवाल म्हणाले, “संचालक प्रकाश जगताप व यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा करणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.