पुणे, ता. 13 : जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा नेते प्रदीप कंद यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी(मावळ विभाग) नियुक्ती झाली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी तथा आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड केली आहे.
प्रदेश निवडणूक अधिकारी तथा भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पत्राद्वारे याबाबतत घोषणा मंगळवारी (ता. 13) केली. प्रदीप कंद यांच्या निवडीने शिरूर – हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीचे जोरदार स्वागत केले.
विकासाभिमुख नेतृत्व म्हणून प्रदीप कंद हे जिल्ह्यात ओळखले जातात. पुणे मावळ विभागाचे जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कंद यांची निवड करून भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडीचे स्वागत केले.
दरम्यान, प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.