बारामती (पुणे) : बारामतीलोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अद्याप ‘लोकसभे’ची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषणा होण्याचे बाकी असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दोन सभा घेतल्या आहेत. यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे २ मार्च रोजी बारामतीत येत आहेत.
त्यांच्या हस्ते येथे विविध विकासकामांचे उद्घाटन होणार असून, नमो महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहितेपूर्वी बारामतीतील विकासकामांचे उद्घाटन व्हावे, असा अजित पवार यांचा आग्रह होता. यानिमित्त महायुती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणसिंग बारामतीतून फुंकणार असल्याचं चिन्हं दिसत आहे.
बारामती शहरातील अत्याधुनिक बसस्थानक, बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयानजीक उभारण्यात आलेल्या पोलिस वसाहतींचे उद्घाटन २ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी आता बारामतीतील प्रशासकीय यंत्रणा कमालीची गतिमान झाली आहे. बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त बसस्थानकाची उभारणी करण्यात आली असून ५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्याचा भाजपने चांगलाच चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात रणनीती आखली आहे. यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झालेले अजित पवारदेखील ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरविणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. खुद्द अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे.