शिक्रापूर, (पुणे) : मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधुन त्या इसमांचे अपहरण करून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसानी जेरबंद केली आहे. पोलिसांनी तिघांना अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
सुशांत पोपट नागरे (वय 25, रा. प्रेमभारती नगर, बोल्हेगाव ता. जि. अहमदनगर), मयुर राजू गायकवाड (वय 24, रा. गांधीनगर चौभे कॉलनी, बोल्हेगाव अहमदनगर), श्रेयस भाउसाहेब आंग्रे, (वय – 24, रा. संभाजीनगर, नागापूर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपी मयूर गायकवाड याच्यावर दोन गुन्हे दाखल असून आरोपी सुशांत नागरे याचेवर एक गुन्हा दाखल आहे. दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील रेकार्डवरील आरोपी आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 10) शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय मल्हार खानावळ जवळ फिर्यादी हे रोडलगत उभे राहिले होते. यावेळी चारचाकीतून आलेल्या तिघांनी फिर्यादीस मारहाण करून त्याचे कडील मोबाईल काढून घेतला. व फिर्यादी यांना घेऊन पुणे-नगर हायवेने निघाले असताना चारचाकीतील आरोपी हे कारेगाव येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी उतरले होते. त्यावेळी फिर्यादीने संधीचा फायदा घेवून गाडीतून पळ काढला. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
सदर घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासादरम्यान सदरची चारचाकी गाडी आरोपी सुशांत नागरे हा वापरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हयात जावून वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी मोबाईल मधील ग्रींडर डेटींग अॅप चा वापर केला होता, सदर अॅपचे माध्यमातून अनोळखी व्यक्तीला संपर्कात आणले जाते. त्याचेकडून त्याचे लोकेशन घेवून त्या लोकेशनला पोहचून आरोपी समोरील व्यक्तीस सोबत घेतात, त्यानंतर त्या व्यक्तीचे विचीत्र फोटो घेवून त्यास भिती घालून पैसे घेतले जातात.
दरम्यान, आरोपींनी शिक्रापूर परिसरात अशा प्रकारचे तीन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत एक अशा एकूण चार गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली असून सदर घटनेमध्ये 80 हजार रूपये जबरीने घेतलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, सदर घटनांमधील पिडीत व्यक्तींचा शोध चालू असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ग्रीडर डेटींग अॅप अगर इतर मोबाईल अॅप द्वारे संपर्कात येवून कोणत्याही नागरीकांना लुटण्यात आले असल्यास अगर ब्लॅकमेल केले जात असल्यास त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, संजू जाधव, सागर धुमाळ, यांनी केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करीत आहेत.