उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ-केसनंद जिल्हा परिषद गटातील उमेदवाराने आयोजित केलेल्या काशी व अयोध्या यात्रेत हिंगणगाव (ता. हवेली) येथील एक 60 वर्षीय व्यक्ती अयोध्या या ठिकाणी येथे बेपत्ता झाला आहे. या घटनेने केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Koregaon-Kesanand Zilla Parishad group/Gat)

शंकर बरकडे, (वय -60 रा. खोरवडा वस्ती, हिंगणगाव, ता. हवेली) असे हरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा शोध हिंगणगाव गावातील नागरिक व त्यांच्या नातेवाईकांकडून सुरु आहे. याबाबत अयोध्या येथील हरवलेल्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे.
हेही वाचा: ऐश्वर्या राय ‘असं’ काही बोलली की पंतप्रधान मोदींनीही वाजवल्या टाळ्या; पहा व्हायरल Video
मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील उमेदवाराने महिला मतदारांना व नागरिकांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शन यात्रा या नावाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी (ता. 12) रेल्वेने काशी व अयोध्या या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आयोजन केले होते. काशी या ठिकाणी देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण प्रभू श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यासाठी अयोध्या या ठिकाणी पोहोचेले. यावेळी शंकर बरकडेही उपस्थित होते.
अयोध्या या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर सर्व नागरिक परतीच्या प्रवासाला माघारी निघाले. यावेळी शंकर बरकडे हे दिसून आले नाहीत. त्यानंतर ते परत पुन्हा त्यांच्या ताफ्याकडे परतले नाहीत. बराच वेळ झाला तरी त्यांचा संपर्क न झाल्यामुळे आयोजकांनी शोध सुरू केला. मात्र कोठेच त्यांचा शोध लागला नाही. यानंतर अधिकृतरीत्या त्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, या सहलीचे आयोजन करताना आयोजक हे एका फॉर्मवर हरवले, अपघात झाला, काही दुर्घटना घडली असता त्याला सर्वस्वी संबंधित व्यक्ती जबाबदार राहील असे लिहून घेतले जात असल्याची माहिती एका नागरिकाने दिली आहे. त्यामुळे नेत्याच्या यात्रेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना घेऊन जाण्यात आले असले तरी सुरक्षा आणि उपस्थिती नोंद असतानाही अशी घटना घडली आहे. बरकडे यांना शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा: नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा घोळ उघड; शहरात गोंधळ, नेमकं काय घडलं?






