पुणे: ताडीवाला रोड परिसरात एका (Pune News) रिक्षाचालक कुटुंबासोबत भयंकर (Pune Crime) प्रकार घडला आहे. या कुटुंबाला गेल्या 2 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत विचित्र प्रकारांचा सामना करावा लागत आहे. घराबाहेरच्या नळाजवळ, टेरेसवरच्या कॉटजवळ आणि घराच्या दारात अनेक ठिकाणी हळदी कुंकू लावलेले कापलेले लिंबू, काळ्या कापडात गुंडाळलेल्या चिठ्ठ्या, शिवीगाळ आणि घराचे वाटोळे होईल असा धमकीचा मजकूर आढळत असल्याने हे कुटुंब पूर्णपणे घाबरले आहे. (Latest Breaking News)

हे प्रकार सतत वाढत गेल्याने त्यांनी शेवटी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांकडून हा प्रकार महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या स्वरूपात तपासात घेण्यात आला आहे. फिर्यादीनुसार प्रशांत शेडोळकर हे रिक्षाचालक असून त्यांचे कुटुंब गेल्या 15 दिवसांपासून मानसिक त्रास सहन करत आहे. 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या भावजयने दरवाज्याजवळच्या नळाच्या पाईपवर हळदीकुंकू लावलेल्या कापलेल्या लिंबाचा पहिला प्रकार पाहिला. त्यानंतर टेरेसवरील लोखंडी कॉटजवळही तसाच प्रकार दिसला. पुढील दिवसांत दरवाजाजवळील पाण्याच्या ड्रमजवळ काळ्या कापडात धमकीची चिठ्ठी, कापलेली लिंबे, तसेच 7 नोव्हेंबर रोजी पहाटे छोट्या टॉवेलमध्ये तीन लिंबे, दोन बाहुल्या आणि धमकीची चिठ्ठी अशा विविध वस्तू सापडल्या.
8 नोव्हेंबर रोजी चार वेगळ्या चिठ्ठ्या मिळाल्या. काही दिवस शांत गेले असले तरी 15 व 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा आजीच्या घराच्या टेरेसवर धमकीच्या चिठ्ठ्या आणि हळदीकुंकू लावलेले लिंबू ठेवलेले होते. या सततच्या घटनांमुळे कुटुंब भयभीत झाले असून त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक घाबरवत असल्याची खात्री पटली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.






