Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोर येथे यंदा पारंपरिक सोहळ्यांसह कुस्तीचा जंगी आखाडा रंगणार असून राज्यातील तसेच उत्तर भारतातील नामांकित मल्ल शुक्रवार (ता. 3) रोजी ताकद आजमावणार आहेत. तब्बल 30 लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आल्याने या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यात्रेच्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये यंदा कुस्तीचा थरार हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. अशी श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी दिली.

लोणी काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ यांच्या वार्षिक यात्रेला गुरुवार (ता. 2) व शुक्रवार (ता. 3) रोजी प्रारंभ होणार आहे. हनुमान जयंती निमित्त पहाटे चार वाजता श्रींच्या मूर्तीची महापूजा केली जाईल. त्यानंतर भाविकांकडून नैवेद्य अर्पण केला जाईल. रात्री छबिना, फटाक्यांची आतषबाजी तर पहाटे पारंपरिक तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे अंबरनाथ आणि जोगेश्वरी देवींचा विवाह सोहळा पार पडणार असून दुपारी तीन वाजता कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.
या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि प्रतिष्ठेची लढत सिकंदर शेख आणि दादा शेळके यांच्यात रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी किताब जिंकलेल्या या दोन्ही दिग्गज मल्लांमधील सामना पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या लढतीच्या विजेत्यास 2 लाख 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची कुस्ती पृथ्वीराज मोहोळ आणि हरियाणातील दमदार मल्ल विक्रांत कुमार यांच्यात होणार आहे. या लढतीसाठी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून राज्य विरुद्ध बाहेरील मल्ल असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेत तिसऱ्या मानांकनासाठीही तीन वेगवेगळ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज राक्षे विरुद्ध जसपाल सिंग, जयदीप पाटील विरुद्ध अमित कुमार, माऊली जमदाडे विरुद्ध प्रवीण कुमार, या तिन्ही लढतीतील विजेत्या पैलवानांना प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील मल्ल आमनेसामने येणार असल्याने आखाड्यात चुरशीचे सामने रंगण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, या कुस्ती स्पर्धेतील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारामुळे यात्रेतील कार्यक्रमांना अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या स्पर्धेचे निवेदन प्रसिद्ध कुस्ती समालोचक प्रशांत भागवत करणार असून त्यांच्या थेट आणि रोमहर्षक समालोचनामुळे प्रेक्षकांना प्रत्येक डाव, पलटवार आणि निर्णय अधिक जवळून अनुभवता येणार आहे.
यात्रा, परंपरा आणि कुस्तीचा अनोखा संगम
श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेच्या धार्मिक वातावरणात पारंपरिक मातीतील कुस्तीचा समावेश झाल्याने लोणी काळभोर परिसरात सणासुदीचा उत्साह उसळला आहे. गावासह आसपासच्या भागातून हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना नवसंजीवनी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे







