लोणी काळभोर, (पुणे) : अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची चारचाकी गाडीतून वाहतूक करणाऱ्या एका इसमाला लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) परिसरातून मुद्देमालासह अटक केली आहे.
सोमनाथ दयानंद शेटप्पा (वय 30, रा. पाषाणकर बाग रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण 350 लिटर गावठी हातभट्टीची दारू व आय 20 चारचाकी गाडी असा 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 29) दुपारी पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास थेऊर परिसरात एक इसम हुंडाई कंपनीच्या आय- 20 कारमधून हातभट्टी दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल बनकर यांना मिळाली होती. त्यानुसार सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने थेऊर परिसरात सापळा रचून सदर वाहन ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आय- 20 गाडीत 10 प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण 350 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली. गाडीचा चालक सोमनाथ शेटप्पा यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस हवालदार, विशाल बनकर, संतोष बारगजे, दिगंबर जगताप, सागर कदम यांनी केली आहे.