पुणे : धायरी परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षा प्रकाश रांगळे (वय ४५, रा. धायरी) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत त्यांचा मुलगा वैभव (वय २५) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वर्षा रांगळे आणि कुटुंबीय धायरी भागात वास्तव्यास आहेत. ६ फेब्रुवारी रोजी त्या सायंकाळी सहाच्या सुमारास धायरी गावातील धायरेश्वर मंदिराजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरने दुचाकीस्वार वर्षा यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षां यांचा मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.