लोणी काळभोर, ता. 18 : राष्ट्रीय शिक्षण अभियानांतर्गत राज्यात समज आणि संख्याशास्त्रासह वाचनात प्राविण्यतेसाठी राष्ट्रीय उपक्रम (निपुण) राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुण्यासह राज्यात गुरुवारी (ता.17) ही परीक्षा पार पडली. मात्र पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यातच लाखो विद्यार्थी या परीक्षेविना वंचित राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येच्या माहेरघरातच हा प्रकार उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर हवेलीत शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दूसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षा 20 मार्च, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून या तारखेला राज्यभरात एकाच वेळी घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

निपुण भारत उपक्रमांतर्गत ही परीक्षा 20 एप्रिलला घेण्यात येणार होती. मात्र यावेळी 20 तारखेला रविवार आल्याने ही परीक्षा 17 एप्रिललाच राज्यभरात घेण्यात आली. पण गट शिक्षण अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ही परीक्षा हवेली तालुक्यात झालीच नाही. त्यामुळे हवेली तालुक्यातील 1 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. अत्यंत महत्वाची परीक्षा न झाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नसल्याने हवेलीचे गट शिक्षणाधिकारी मनमानी कारभार हाकत आहेत का? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगली आहे.

हवेलीचे शिक्षणाधिकारी यांनी यातून पळवाट काढून ही परीक्षा उद्या शनिवारी (ता.19) घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेची गोपनीयता न ठेवता प्रश्नपत्रिका थेट शिक्षकांच्या व्हाट्सअॅपसह सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. तसेच सर्व शिक्षकांना शनिवारी परीक्षा घेऊन पेपरवर मागील दोन दिवसांपुर्वीची म्हणजे गुरुवार 17 एप्रिलचीच तारीख टाकण्याची सूचना दिली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्याचा इतका भोंगळ कारभार आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. म्हणून अशा गट शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच शिक्षण विभाग या कामचुकार अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुण्यासह राज्यभरात ही परीक्षा गुरुवारी (ता. 17) पार पडली. मात्र हवेलीत ही परीक्षा उद्या शनिवारी (ता.19) होणार आहे. म्हणजे याआगोदरच सगळीकडे हा पेपर झालेला आहे. आता परीक्षा घेणे म्हणजे एक प्रकारची पेपर फुटीच होय. हवेली तालुक्यात 165 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. तर 681 शिक्षक अध्यापनाचे काम करतात. या शाळांमधून 1 लाख 68 हजार 816 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारात सापडले आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारणार की पाठीशी घालणार हेही महत्वाचे ठरणार आहे. तसेच याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे हे 12 एप्रिलपासून सुट्टीवर असल्याची माहिती मिळाली. तर हवेली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे यांच्याशी फोन केला असता, त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याचे दिसून आले.







