पुणे: पुण्यातील वारजे भागातील महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना हेरून दुचाकीवरून येत सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलिसांनी कारवाई करीत दोन सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक चौकशीत इतर तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आकाश आंबादास आंधळे (वय 24, रा. दागंट पाटीलनगर शिवणे) आणि सुजल नरेश वाल्मिकी ( 20 वर्षे, रा. दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान, शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दुचाकीवरून येऊन काही तरूणांनी महिलांच्या सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मागील दोन आठवडे तपास करत वेगवगेळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच बातमीदाराकडून माहिती मिळविली. दरम्यान याबद्दल वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना माहिती देण्यात आली होती. पुढील तपास सुरू होता.
मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणावरुन पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार यांना अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांबद्दल माहिती मिळाली. आरोपी हे वारजे येथील एनडीए मैदानावर आहेत, असे त्यांना समजले. ही माहिती तातडीने वरिष्ठांना कळवून उपनिरीक्षक नरळे पथकासह त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी आरोपी आंधळे आणि वाल्मिकी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्हे केल्याची कबुली दिली.
दरम्यान, केलेल्या तपासात वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आले. तसेच आरोपींकडून चोरीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दोन लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या सुचनांनुसार तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.