पुणे : महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी व लाखो रुपये घेतल्या प्रकरणी गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महादेव बाबुराव दराडे (वय 32, सध्या रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजित लक्ष्मण चौरे (वय 35, सध्या रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील चौरे हा महसूल कार्यालयात सहायक लिपिक म्हणून कार्यरत आहे. फसवणूक प्रकरणी एका तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनूसार दराडे याच्याविरुद्ध 10 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दहा लाख रूपये उकळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,आरोपी दराडे हा जमीन खरेदी विक्रीचे काम करतो. शासकीय कार्यालयात कामानिमित्त त्याची नियमित ये-जा होती. दारडे याने अनेकांकडे स्वतः महसूल सचिव असल्याची बतावणी केली होती. तक्रारदार तरुणाची एका ओळखीच्या व्यक्तिच्या माध्यमातून दराडेशी ओळख झाली. त्यानंतर दराडेने फसवणूक झालेल्या तरूणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती करतो, असे सांगून वेळोवेळी दहा लाख रूपये उकळले.
पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्रे केली जप्त
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान पोलीस कर्मचारी उज्ज्वल माेकाशी यांना मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी दराडे याला अटक करण्यात आली. त्याची मोटार, तसेच वाकड येथील वास्तव्यास असणाऱ्या घरातून पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत. आरोपी दराडे याला रणजित चौरे हा बनावट नियुक्तीपत्र बनवून देण्यासाठी मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी चौरे यालाही अटक केली आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायकआयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस कर्मचारी शंकर नेवसे, उज्ज्वल मोकाशी, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, नागेश राख यांच्यासह पथकाने केली आहे.
तरुणांनी पोलिसाशी संपर्क करावा
दरम्यान, दराडे याने महसूल सचिव असल्याची बतावणी करुन राज्यभरातील 20 ते 25 जणांची फसवणूक केलेली असू शकते अशी शक्यता आहे. त्याच्या घरून पोलीस, वन आणि महसूल विभागाचे बनावट नियुक्तीपत्रे, शिक्के अशी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याने आणखी इतर काही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. तरुणांनी पोलिसाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.