पुणे : घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. भीमराव मुकिंदा कांबळे (वय 27, मूळ. रा. सांडस, ता. कळमनरू, जि. हिंगोली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली आहे. याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं
अधिक माहिती अशी की, ही घटना डिसेंबर 2017 मध्ये घडली होती. पीडित मुलीच्या घराशेजारी कुक्कुटपालन व्यवसाय होता. तेथे आरोपी कांबळे कामगार म्हणून होता. अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत आरोपी कांबळे तिच्या घरात शिरला. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगू नको अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते.
त्यानंतर हडपसर पोलिसांनी तपास करुन आरोपी कांबळेला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. याप्रकरणात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील घोगरे पाटील यांनी युक्तिवादात केली. साक्ष, तसेच वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी कांबळे याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबरोबरच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.