पुणे : पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. अफीमच्या बोंडांचा चुरा म्हणजेच पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगल्यामुळे पोलिसांनी एक जणाला अटक करून पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार उमेश बबन रजपुत यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेमाराम गंगाराम चौधरी (वय 28, रा. जोधपुर) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील भैरोबानाला जंक्शन येथील रस्त्यावरून शनिवारी ( 26 एप्रिल) रोजी वानवडी पोलिसांनी आरोपी चौधरी याला अटक केले. तेंव्हा तपासात चौधरी याच्याकडे पॉपीस्ट्रॉ (अफीमच्या बोंडांचा चुरा) हा अंमली पदार्थ सापडला. त्याची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी त्याने सोबत बाळगला होता.
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून 1 लाख 42 हजार 490 रुपये किंमतीचा 14 किलो 249 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ, तसेच 2 हजार रुपयांच्या दोन बॅगा, दोन हजारांचा एक साधा मोबाईल फोन, आधारकार्ड, 520 रुपये रोख रक्कम असा 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी आरोपी चौधरीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.