पुणे: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 13 एप्रिल 2019 रोजी केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. बहिणीचा गळा आवळून खून केलेल्या भावाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेल्या बचत योजनेतील रक्कम मागितल्यामुळे खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रज्वल (वय 19, रा. हिंगणे) याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात खुनाची तक्रार दिली होती. या प्रकरणी रविंद्र श्रीनिवास जाळगी (वय 48, रा. कर्वे नगर) याला अटक केली आहे.
दिलेल्या निकालात काय?
या प्रकरणी पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार, ठोठावलेल्या दंडातून 9 लाख रुपये मृत महिलेचा मुलगा आणि मुलगी यांना देण्यात येणार आहेत. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 6 महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल.
अधिक माहिती अशी की, मृत महिला कस्तुरी शेखर माने (वय 45) या कर्नाटकातील मूळ रहिवासी होत्या. त्यापुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहत होत्या. सदर घटना 13 एप्रिल 2019 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले आणि 9 साक्षीदार तपासले. याप्रकरणाचा तत्कालीन पोलिस अधिकारी सतीश उमरे यांनी तपास केला होता. सहायक पोलिस हवालदार एस.पी. पुणे यांनी सरकारी पक्षाचे काम पाहिले.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी रविंद्र जाळगी हा कस्तुरीचा मानलेला भाऊ होता. तिने जाळगीकडे आपल्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे ठेवले होते. त्यानंतर कस्तुरीने वेळोवेळी त्याच्याकडे ठेवलेले पैसे मागितले, परंतु त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. जाळगी महिलेला आणि तिच्या मुलांना फिनाइल पिण्याची धमकी द्यायचा. सदर घटनेच्या दिवशी घरात दोघेच होते. जाळगी याप्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी आला होता, पण त्यावेळी त्याने महिलेचा गळा दाबून खून केला.