पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने गेल्या सहा वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांचा कर भरणा थकवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभही मिळत नसल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत एका रुग्णास उपचार नाकारल्याची माहिती समोर आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवर मोफत उपचार केला जातो. मात्र, मंगेशकर रुग्णालयात या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे.
महानगरपालिकेची नोटिस
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने 14 जानेवारी 2021 रोजी काढलेल्या अधिसूचनेतील नियम 11 (जे) मधील अनु क्र. 1 ते 3 चे या रुग्णालायकडून पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार गंभीर स्वरुपचा असून, द बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 व महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 14 जानेवारी 2022 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला महापालिकेची नोटीस प्राप्त होताच 24 तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांच्या खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा. अशी नोटीस बजावली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी ही नोटीस बजावली आहे.