पुणे : पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून एक बातमी समोर आली आहे. पुणे शहरात येऊन पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांवर खुनाचा प्रयत्न तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीसह विविध गुन्हे आहेत. तो सध्या तडीपार असतानाही त्याने पुणे शहरात येऊन पिस्तूल बाळगले होते. किरण विठ्ठल शिंदे (वय 23, रा. कुष्णकुंज अपार्टमेंट, स्वामीनारायण मंदिराजवळ, नर्हे) आणि मयुर ऊर्फ आनंद नंदकिशोर वाकोडे (वय 19, रा. भेंडी चौक, आंबेगाव) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार देवा रमेश चव्हाण यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरण विठ्ठल शिंदे याच्यावर तो अल्पवयीन असतानाही खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. तो हा सराईत गुन्हेगार आहे. हडपसर परिसरात मॅफेनटरमाइन सल्फेट या इन्जेक्शनची विक्री करताना त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. निरज ढवळे टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) केलेल्या कारवाईत किरण शिंदे याचा समावेश होता. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी 10 जानेवारी 2024 रोजी किरण शिंदे याला 2 वर्षांसाठी तडीपार केले होते.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार तारु, पोलीस अंमलदार भोरडे, ओलेकर, पाटील, मोहिते हे 23 एप्रिल रोजी पेट्रोलिंग करीत धायरी फाटा चौकात आले होते. तेव्हा तडीपार गुंड किरण शिंदे हा साथीदारासह मुंबई महामार्गाकडे जाणार्या रोडच्या कडेला प्रयेजा सिटीजवळ थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे,अशी बातमी त्यांना मिळाली. मिळालेल्या बातमीनुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले.
अंगझडती घेतली असता किरण शिंदेकडे पिस्तुल तर मयुर वाकोडे याच्याकडे जिवंत काडतुस सापडली. पोलिसांनी दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम तपास करीत आहेत.