शिक्रापूर (Pune) : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत एका हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन योगेश रामचंद्र शिर्के, अरुण गणेश वानखेडे व श्रीमंत उर्फ आबासाहेब अशोकराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत शंभूराजे हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये इसम कल्याण नावाचा मटका खेळत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस हवालदार अमोल दांडगे, महेंद्र पाटील व नवनाथ नाईकडे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना काही इसम कागदावर आकडेमोड करत मटका खेळत असताना दिसून आले. दरम्यान पोलिसांनी त्यांना जागेवर पकडत मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करत योगेश शिर्के व अरुण वानखेडे या दोघांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस अमोल अंबादास दांडगे (वय ३६ रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी योगेश रामचंद्र शिर्के (वय ४५) व अरुण गणेश वानखेडे (वय ५५ दोघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) तसेच श्रीमंत उर्फ आबासाहेब अशोकराव पाटील (रा. सणसवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव भालेराव हे करत आहे.