पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस शिपाई शिवाजीनगर पोलीस वसाहतीत राहायला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलीस शिपायाने समाजमाध्यमात एक जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष जाहिरातीत दाखविण्यात आले होते.
जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर पोलीस शिपायाने संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. चोरट्यांनी त्यांना एक ॲप माेबाइलमध्ये घेण्यास सांगितले. त्यानंतर त्या ॲपमध्ये चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले.
गेल्या आठ महिन्यांत त्यांनी चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी ७ लाख ४५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी ॲपच्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे भासविले. ॲपद्वारे परताव्यापोटी जमा झालेली रक्कम त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम त्यांना काढता आली नाही. त्यानंतर चोरट्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.