टोकियो, जपान- भारतीय वंशाचे जपानी राजकारणी आणि टोकियो मेट्रोपॉलिटन असेंब्लीचे आमदार योगेंद्र पुराणिक यांनी जपानमधील त्यांच्या निवासस्थानासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला आहे. पुराणिक जपानमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचा प्रचार करत असल्याची कौतुकास्पदबाब समोर आली आहे. पुराणिक यांचा पुतळ्याजवळ उभा असलेला एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी महाराजांबद्दल असलेला आदर व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने जपानमध्ये आलेला अनुभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत या आमदाराचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर हि माहिती शेअर केली आहे.
पुण्यातील खटावकर यांनी महाराजांचा पुतळा तयार केला असून तो विमानाने जपानला आणला याला 10 लाख रुपये इतका खर्च आला. 8 मार्च 2025 रोजी पुतळा उभारण्यात आला, या कार्यक्रमाला सुमारे 900 भारतीय लोक उपस्थित होते.
विजय मंगल दत्तात्रय गाढवे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली सांगितले कि, जपानी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यात योगेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि महाराष्ट्राची परंपरा जोपासण्यासाठी विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग आहे. मराठी वारसा जपण्याच्या त्यांच्या समर्पणामुळे अनेकांनी त्यांच्या प्रति कौतुक आणि आदर व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांच्या प्रयत्नांमधून स्पष्ट होते. पुराणिक यांची आई जपानमध्ये रेस्टोरंट चालवते त्यात साबुदाणा खिचडीपासून ते पुरणपोळीपर्यंत सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. योगेंद्र यांनी त्यांच्या 3 मजली इमारतीमध्ये मराठी पुस्तके ठेवली असून मराठी भाषेचे क्लासेसही याठिकाणी घेतले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली 300 हस्तलिखित पत्रांचा खजिनाही येथे उपलब्ध आहे.
येथे पाहा पोस्ट:
कोण आहेत योगेंद्र पुराणिक, जाणून घ्या
जपान येथील भारतीय आमदार योगेंद्र पुराणिक यांनी जपान येथे राजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठींब्यानंतर जपानमध्ये निवडणूक जिंकणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनले. १९९५ ला जपानची स्कॉलरशिप घेऊन योगेंद्र जपानला गेले होते. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोलीस चौकी येथे त्यांचा वाडा होता.
एप्रिल २०१९ मध्ये टोकियोच्या एडोगावा सिटी असेंब्लीमध्ये ते जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठिंब्याने नगर परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले. याव्यतिरिक्त, एप्रिल २०२२ मध्ये, पुराणिक यांची इबाराकी प्रीफेक्चरमधील त्सुचिउरा फर्स्ट हायस्कूलचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे ते जपानमधील सार्वजनिक शाळेचे पहिले परदेशी प्राचार्य आणि पहिले भारतीय वंशाचे प्रशासकीय अधिकारी बनले.
हायस्कूल, ज्युनियर हायस्कूल आणि नाईट स्कूल असलेल्या या शाळेत ११०० हून अधिक विद्यार्थी आणि १०० शिक्षक आहेत. जी शाळा जपानच्या टॉप-रेटेड शाळांपैकी एक मानली जाते. त्यांच्या कामगिरीद्वारे, पुराणिक यांनी भारत आणि जपान दोन्ही देशांमध्ये आदर मिळवला आहे.