पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: नशामुक्त समाज अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्वाचा असून, नशामुक्त समाज निर्मितीसाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.
रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरुर येथील पोलिस ठाण्याच्या वतीने नशामुक्ती अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पोलिस पाटील, शाळांचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, विविध गावचे सरपंच यांसह विविध शाळांचे मुख्याद्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक वाघमोडे म्हणाले की, नशामुक्त अभियानात लोकसहभागासाठी प्रत्येक नागरिकाने सैनिक म्हणून भूमिका बजवावी. अमंली पदार्थाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, व्यसनाधिनता वाढते. अंमली पदार्थामुळे अर्थव्यवस्था व युवक पोखरले जात आहे.
युवक व्यसनाच्या आहारी गेल्यावर संबधिताचा रोजगार, व्यवसाय व कुटुंबावर परिणाम होत असतो. नशामुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प सर्वानी मिळून करावा असे ही ते म्हणाले. अपेक्षांचे ओझे व त्यातुन अपेक्षा भंग झाल्यास येणारे नैराश्य , कुतूहुल व संगत यातून व्यसनाकडे युवक जातात. अफू गांजा, भांग, ब्राउन शुगर, एम. डी. चरस, एल.एस.डी यासारखे अंमली पदार्थ आहेत. आपल्या परिसरात असे पदार्थ अथवा त्याचे सेवन करणारे आढळल्यास पोलीस स्टेशनकडे संपर्क करावा.
एखाद्या टपरीवर विशिष्ट वेळी मोठी गर्दी होत असतील तर त्याची ही माहिती द्यावी. अंमली पदार्थाचे व्यसन करताना कोणी आढळले, शेतात कोणी गांजा लावलेला असेल तर त्याची ही माहिती पोलीसांना कळवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी केले.
युवा पिढी व्यसनापासून आपण वाचविली पाहिजे. प्रत्येकाने नशामुक्त अभियानात सैनिक म्हणून काम करावे. व्यसनाच्या या विळख्यात आपला मित्र, कुटुंबातील सदस्य कोणीही सापडू शकतो. व्यसनाधिन लोकांना व्यसनापासून बाहेर काढून त्यांना जीवदान द्यावे. व्यसनाधिन व्यक्तींना आधार देत त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आपली मानव संसाधनं चांगली राहण्यासाठी ती नशामुक्त असली पाहीजेत. व्यसनाधिन व्यक्तीना आधार देत त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शाळा महाविद्यालय याचा नशामुक्त अभियानातील सहभाग कसा असावा याबाबत ही पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.