यवत, ता.१४ : सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत असून या नवरात्रौत्सवासाठी यवत (ता. दौंड) गावातील श्री महालक्ष्मी माता मंदिर, श्री तुकाई माता मंदिर, श्री कळकाई माता मंदिर येथे नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. तर नवरात्र उत्सवाची सुरवात रविवार (ता. १५) पासून सुरु होणार आहे.
यवत गावची ग्रामदेवी व पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे नवरात्रोत्सवात दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात दरवर्षी श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्यावतीने श्री महालक्ष्मी माता नवरात्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यावर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती गणेश शेळके यांनी दिली
नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस श्री महालक्ष्मी मातेची विविध रूपातील अलंकारिक पूजा करण्यात येणार असून पारंपारिक दागिन्यांबरोबरच देवीला नऊ दिवस नऊ विविध रंगाचे वस्त्र परिधान करण्यात येत असून नऊ दिवसातील नऊ रूपातील पूजा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात
रविवारी सकाळी दहा वाजता मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नऊ दिवस रोज सकाळी व संध्याकाळी देवीची महाआरती करण्यात होणार असून या काळात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, यवत येथील श्री तुकाई माता मंदिर येथे देखील रोज महापूजा सप्तशती वाचन, भजन, होम हवन यासारख्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विनायक अवचट यांनी दिली. यावेळी गावातील गोंधळी, आराधी हे पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम देवीसमोर सादर करत असतात. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी माता येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले असून श्री तुकाई माता मंदिर व श्री कळकाई माता मंदिराला देखील विद्युत सजावट करण्यात आली असून नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.