सासवड(पुणे): खानवडी येथून एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. खानवडी गावठाण येथील रहिवाशी गजानन व गीतांजली धिवार यांची पर्स हरवली होती. पर्स मध्ये महत्वाच्या कागदपत्रांसहित १२ तोले सोने आणि ५० हजार रोकड अशी एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हरवल्याने धिवार दाम्पत्य चिंतेत होते. मात्र खानवडी गावचे रहिवाशी असलेल्या संदीप सुतार यांनी मुद्देमालासाहित पर्स परत केली. संदीप सुतार यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे खानवडी परिसरातुन कौतुक करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी की, खानवडी गावठाण येथील रहिवाशी गजानन व गीतांजली धिवार यांची पर्स हरवली होती. पर्स मध्ये महत्वाच्या कागदपत्रांसहित १२ तोले सोने आणि ५० हजार रोकड अशी एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हरवल्याने धिवार दाम्पत्य चिंतेत होते. मात्र खानवडी येथील संदीप सुतार हे कामावरून घरी येत होते. दरम्यान, बुधवार (५ जानेवारी) रोजी रात्री एखतपूर, मुजवडी जवळ रस्त्यामध्ये त्यांना एक पर्स पडलेली दिसली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात त्यांनी गाडी थांबवून ती पर्स उचलली. त्यामध्ये काही रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि सोने होते. संदीप सुतार यांनी खानवडी, खळद एखतपूर परिसरामध्ये विचारपूस केली पण पर्स कोणाची आहे ते कळले नाही.
दरम्यान, गजानन धिवार, पत्रकार संतोष डुबल, नितिन होले, भिकाजी धिवार, दिगंबर नेटके यांनी सदरची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. सोशल मीडियावरून ही माहिती संदीप सुतार यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर संदीप सुतार यांनी गजानन व गीतांजली धिवार यांची भेट घेतली.
या वेळी संदीप सुतार यांनी खानवडी येथील धिवार यांना बाळ सिद्धनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या समक्ष सदरील पर्स त्यांना परत केली. त्यानंतर संदीप व राजश्री सुतार या दापत्याचा सन्मान केला. दाखवलेल्या प्रमाणिकपणामुळे खानवडी गावामधून संदीप सुतार यांचे आभार मानले. संदीप सुतार यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल खानवडी, एखतपूर, मुंजवडी, खळद, बेलसर, कुंभारवळण परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी ,खानवडी गावच्या माजी सरपंच तसेच जागतिक आरोग्य सल्लागार दिपाली नितीन होले, ग्रामस्थ दत्ताभाऊ होले, राजेंद्र जठार, खानवडी ग्रामविकास अधिकारी अनिल जगताप लंकाबाई वाडकर, धिवार यांचे जावई व मुलगी उपस्थित होते.