पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचा विद्यार्थी प्रथमेश महाले दिग्दर्शित ‘प्रदक्षिणा’ या १४ मिनिटांच्या मराठी लघुपटाची नुकत्याच गोवा येथे झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इप्फी) निवड झाली.
‘इफ्फी’साठी जगभरातून अनेक निर्मात्यांनी त्यांच्या लघुपटांची नोंदणी केली होती. मात्र, त्यातील पॅनोरमा विभागात केवळ २२ लुघपट निवडले गेले. या प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवात एमआयटी एडीटीचा झेंडा रोवण्याची संधी प्रथमेशला मिळाली.
प्रथमेश हा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधील फिल्म आणि व्हिडिओ डिझाइन शाखेत शिकत असून, पदवीचे शिक्षण घेत असताना इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात लघुपट सादर करणारा तो कदाचित सर्वांत तरुण दिग्दर्शक आहे. त्याने स्वतःच हा लघुपट लिहून संपादन देखील केले आहे. प्रथमेशसोबत त्याचे आई-वडील आणि फॅकल्टी मेंबर्सही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते.
या वेळी प्रथमेशला इफ्फीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथमेशच्या या उपलब्धीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता कराड, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे व कुलसचिव डॉ. महेश चोपडे, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संचालक डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता डॉ. आनंद बेल्हे यांनी त्याचे कौतुक केले आहे.