पुणे: पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगात जुन्या वाहनांची विक्री करून पैसे जमा केले जात आहेत. महापालिकेच्या वाहन विभागाकडील १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या झालेल्या ४७३ पैकी २६० वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यातून महापालिकेला सव्वातीन कोटी रुपये मिळाले आहेत.
पालिकेच्या वाहन विभागाकडे सध्या एकूण १,१६३ वाहने आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांची वाहने, घनकचरा विभाग, पाणीपुरवठा, अग्निशमन दल यांसह सर्व विभागांचा समावेश आहे. केंद्र सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी दोन वर्षांपूर्वी आणली. त्यानुसार १५ पेक्षा जास्त वर्षांची वाहने रस्त्यावर आल्यास त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे धोरण आणले आहे. त्यानुसार, पुणे महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ४७३ वाहने सेवेतून बंद केली आहेत.
यामधील काही वाहने १५ वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादेची होती. महापालिकेने ही वाहने गुलटेकडी येथील वाहन विभाग, कोंढवा आणि हडपसर येथे ठेवली होती. ही वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत होती. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका या वाहनांचा लिलाव करण्यासाठी प्रयत्न करत होती. सुरुवातीला हे काम आरटीओला दिले होते; पण त्यांना यामध्ये यश आले नाही.
आता पुणे महापालिकेने १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या ४७३ वाहनांची लिलाव प्रक्रिया केली. त्यातील २६० गाड्यांचा लिलाव झाला आहे. त्यातून पालिकेला सव्वातीन कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित वाहनांचे लिलाव येत्या दोन ते तीन दिवसांत केले जाणार आहेत.