पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. बदलीस पात्र ठरणाऱ्या वर्ग १ ते ४ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आणि विभागप्रमुखांकडून माहिती मागविण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्यात बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे बदलीसाठी पात्र आणि वैयक्तिक अथवा वैद्यकीय कारणास्तव ज्यांना बदली हवी, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती ८ ऑगस्टपर्यंत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावी, असे पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना पाठविले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण २०११ मध्ये तयार केले आहे. एका विभागात तीन वर्ष सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरतात. प्रशासन विभागाने आता बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी कागदपत्रांसह मागवली आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदली मिळण्याबाबतचा अर्ज संबंधित विभागाकडे द्यायचा आहे. हे सर्व अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे संबंधित विभागप्रमुखांनी ८ ऑगस्टपर्यंत जमा करायचे आहेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बदली संबंधीचा अर्ज संबंधित विभागाने प्रशासनाकडे न पाठवल्यास आणि त्याबाबत तक्रार आल्यास त्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर निश्चित करण्यात येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी परिपत्रकात म्हटले आहे.