पिंपरी-चिंचवड: विमा पॉलिसीवर आकर्षक लाभ मिळेल असं सांगून एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची 2 कोटी 30 लाख 8 हजार 898 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली आहे. यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे आणि दिल्ली येथे कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती (रा. पुणे), भूपेंदर जीवनसिंग जीना (रा. दिल्ली) आणि लक्ष्मणसिंग हरेंदरसिंग (रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, आरोपींनी विमा कंपन्यांचे एजंट असल्याचे भासवून फिर्यादीला मोठ्या परताव्याच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी एनपीसीआय, आयआरडीए आणि दिल्ली अर्थ मंत्रालयातून बोलत असल्याचा बनाव करून फिर्यादिंचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी करून 2 कोटी 30 लाख 8 हजार 898 रुपये उकळले.
दरम्यान, पैशांची मागणी केल्यानंतर फिर्यादीने 1 कोटी 61 लाख 40 हजार रुपये पुण्यातील लक्ष्मणकुमार प्रजापती याच्याकडे दिले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील शनिवार पेठेत त्याला अटक केली. आरोपी प्रजापतीच्या घरातून 10 लाखांची रोकड आणि पैसे मोजण्याचे मशीन व काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
फरिदाबादमध्ये राबवलेल्या शोधमोहीमेत पोलिसांनी संशयित भूपेंदर जीना आणि लक्ष्मणसिंग यांना अटक केली आहे. केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्या केल्याची कबुली दिली आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करत करत आहे