Pune Crime: पुणे, ता. 28 : थर्टी फस्ट, नववर्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विक्री करण्यासाठी चालवलेली हातभट्टी दारूची गाडी पकडण्यास राज्य उत्पादन शुल्काला यश आले आहे. काळेवाडी-ताथवडे बीआरटी रस्त्यावरील वाहनाची तपासणी करताना शनिवारी (ता.27) कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्काने या कारवाईत सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन एकास अटक केली आहे.

कल्याण मधुकर कोकरे (वय 22, सध्या रा. भैरवनाथ सोसायटी, पाटीलनगर, कुदळवाडी, चिखली, पुणे, मूळ रा. मु.रिटेवाडी, पो. राजुरी, ता. करमाळा, शितेवाडी राजुरी, जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क हे गाड्यांची तपासणी करत होते. तेव्हा त्यांना अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पोमध्ये 35 लिटर क्षमतेचे हातभट्टी गावठी दारूने भरलेले 35 प्लॉस्टीक कॅन आढळून आले. पोलिसांनी मोबाईल फोन, टेम्पोसह सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख , अंमलबजावणी व दक्षता विभागाचे सह-आयुक्त पी.पी.सुर्वे , विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक अतुल कानडे साहेब, उप-अधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक अभय औटे, ब्रम्हानंद रेडेकर, गणेश पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
1 डिसेंबरपासून 48 जणांवर कारवाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे निवडणुका असल्याने विभागामार्फत हातभट्टी निर्मुलन तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक मोहिम रोबवली जात आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयाने 1 डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ) (ई), 68, 84 व 85 अन्वये एकूण 22 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 48 इसमांवर कारवाई करून 3 वाहनासह 10 लाख 37 हजार 755 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अवैध दारू विक्रीवर या पुढेही सतत कारवाया चालू राहणार आहेत. बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणा-या व्यक्तीची माहीती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या कार्यालयीन क्रमांक 020-2612-7321 यावर कळवावे. तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या टोल फ्री क्र.18002339999 व व्हॉटसअप क्र. 8422001133 यावर संपर्क साधावा. तुमच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जाईल.
अतुल कानडे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे)






