दौंड, (पुणे) : दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी (ता. 28) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजे (ता. दौंड) हद्दीतील हॉटेल स्वरसंग्रामचे समोर हा अपघात झाला.

अक्षय बाळासाहेब इथापे (वय 32,) आणि दौलत भाऊ गोटे (वय-38, दोघे रा. बेलवंडी बुद्रुक, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे आहेत. तर सौरभ राजकुमार धेंडे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे कारचालकाचे नाव आहे. याबाबत तुषार बाळासाहेब इथापे (वय 28, रा. बेलवंडी (बु), ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय इथापे आणि दौलत गोटे हे हिरो कंपनीच्या एचएफ डिलक्स दुचाकीवरून (एमएच 16 बीपी 3948) दौंडहून शिरापूरच्या दिशेने जात होते. यावेळी शिरापूरकडून दौंडकडे येणाऱ्या हुदाई कंपनीच्या ऑरा कारने (एमएच 12 झेडयू 1722) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

दरम्यान, कारचालक सौरभ धेंडे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात कार चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या धडकेत दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपाटे करीत आहेत.






