पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंदारची प्रकृती आता स्थिर असून, शुक्रवारी (ता. २७) त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे त्याची प्रकृती नियंत्रणात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंदारवर आधी गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार झाल्याने हातांची हाडे आणि नसांना मोठी इजा झाली होती. त्याचा एक हात मनगटापासून वेगळा झाल्याची माहितीही समोर आली होती. डोक्याच्या मागील बाजूस तीन वार करण्यात आले होते.
हल्ल्यानंतर मंदारला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून मोठ्या प्रमाणातील रक्तस्राव थांबवला. तसेच दोन्ही हातांतील तुटलेली हाडे आणि नसांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शुक्रवारी मंदारला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. पुढील १५ दिवस त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. गरज भासल्यास पुढील शस्त्रक्रिया आणि उपचार केले जाणार आहेत.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारच्या जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. मात्र, वेळेत उपचार करून रक्तस्राव थांबवण्यात आला. हातांच्या हाडांवर आणि नसांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.






