पुणे : ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाशी संबंधित एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातील वाद आणि वैयक्तिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडिओ संदेश तयार केला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण प्रेमसंबंधातील तणाव आणि भावनिक त्रासाबाबत बोलताना दिसत आहे. संबंधित व्यक्तीशी संवाद होऊ न शकल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे. या संदेशात त्याने आपल्या भावनिक अवस्थेबाबत आणि नात्यातील मतभेदांबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, तरुणीच्या भावाचा या विवाहाला विरोध असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या विरोधाचा तरुणाच्या मृत्यूशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पोलिसांकडून तरुणाचा व्हिडिओ संदेश, त्यातील उल्लेख आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. मृत्यूमागील नेमकी कारणे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.






