विशाल शिंदे

भोर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी आणि जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमधील जप्त करण्यात आलेला सोन्याचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. नसरापूर येथील सराफ दुकानातून चोरीस गेलेल्या ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्या, तसेच कापूरहोळ येथे महिलेच्या गळ्यातून हिसकावून नेलेले एक लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अशा एकूण दोन लाख १२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा यात समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा भांड उपस्थित होते.
राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये नोंद असलेल्या या प्रकरणात नसरापूर येथील पंडित ज्वेलर्स या सराफ दुकानातून सोन्याच्या चमक्या चोरीस गेल्या होत्या.

१३ मे २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी महिला आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा असे दुकानात आले होते. त्यावेळी दुकानात ग्राहकांची गर्दी होती. फिर्यादी विनय पंडित आणि त्यांची आई मंगल दुकानाच्या काउंटरवर उपस्थित होते. यावेळी काही महिला सोन्याच्या चमक्या पाहत होत्या, तर फिर्यादींची आई अन्य महिलांना दागिने दाखवत होती.
याच गर्दीचा आणि दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचा फायदा घेत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या मदतीने सोन्याच्या चमक्यांची दोन पाकिटे चोरून घेतली. त्यानंतर ही पाकिटे त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलाच्या हातात देण्यात आली. कोणतीही खरेदी न करता या महिला दुकानातून निघून गेल्या.
या घटनेत ३० हजार रुपये किमतीच्या पाकिटातील ६० सोन्याच्या चमक्या आणि ३२ हजार रुपये किमतीच्या पाकिटातील २४ सोन्याच्या फॅन्सी चमक्या, असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी विनय पंडित यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दुसरी घटना २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर घडली होती.
वंदना सपकाळ या पाटील डॉक्टर यांच्याकडून घरी पायी जात असताना लहान पुलाजवळ समोरून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर हे दोघे मोटारसायकलवरून भोर फाट्याच्या दिशेने पसार झाले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या मिनी गंठणाची किंमत एक लाख ५० हजार रुपये होती.
या प्रकरणी वंदना सपकाळ यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दोन्ही घटनांमधील जप्त करण्यात आलेला सोन्याचा मुद्देमाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. यामध्ये नसरापूर येथील सराफ दुकानातून चोरीस गेलेल्या ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्या आणि कापूरहोळ येथील महिलेचे एक लाख ५० हजार रुपये किमतीचे मिनी गंठण यांचा समावेश आहे.
या वेळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा भांड उपस्थित होते. चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने संबंधित फिर्यादींना दिलासा मिळाला आहे.
एकूण दोन लाख १२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आल्याने राजगड पोलिसांच्या या कार्यवाहीचे परिसरातून स्वागत होत आहे.






