दौंड, (पुणे) : दौंड शहरातील गोवा गल्ली परिसरात वखारीच्या आडोशाला ऑनलाइन मुंबई-कल्याण मटका जुगार चालविणाऱ्या टोळीचा प्रकार उघडकीस आला आहे. मटका जुगार खेळणारे, खेळविणारे आणि ऑनलाइन व्यवहार स्वीकारणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण 15 जणांची नावे समोर आली असून, पोलिसांनी एक मोबाईल फोन जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी महाराज चौक ते सिद्धटेक रोडवरील एका वखारीच्या आडोशाला रोहित राजू गायकवाड, विल्सन विल्यम हॉग आणि रोहन रतन जाधव हे तिघे विलास सामवेल गायकवाड या अपंग व्यक्तीच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार चालवत असल्याचा आरोप आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून मोबाईलद्वारे ऑनलाइन पेमेंट स्वीकारून बेकायदेशीर कल्याण-मुंबई मटका जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.
यावेळी मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपावरून विशाल सरोदे, विनोद गायकवाड, संजय जगताप, मोहन मोहिते, जाफर सय्यद, उमेश परकाळे, इमाम पठाण, वसंत गदादे, संजय दळवी, साहिल गायकवाड आणि रफीक शेख यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात आली. ऑनलाइन मटका जुगाराचे व्यवहार स्वीकारणाऱ्या शिर्डी येथील सचिन घाटे याचाही या प्रकरणात समावेश आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि त्यामधील सिमकार्ड जप्त केले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भालेराव करीत आहे.






