डॉ. अशोक बालगुडे

नवी दिल्ली: मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत मतभिन्नतेची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वपूर्ण राजकीय आश्वासन दिले आहे. पवार यांच्या पक्षाने मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा दिला, तरी इंडिया आघाडीतील त्यांचे स्थान कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावरून आघाडीत संभाव्य फूट पडण्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
संसदेत सोमवारी मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे संकेत मिळत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पवार यांच्या पक्षाचे आघाडीतील स्थान अबाधित राहील, असे सांगितले.

दरम्यान, ८५० लोकसभा मतदारसंघांच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध कायम असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. ५४३ विद्यमान जागांवर महिला आरक्षण लागू करणे आणि नव्या जनगणनेच्या आधारे आरक्षणाची अंमलबजावणी करणे याला विरोध नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, मतदारसंघांची संख्या ८५० पर्यंत वाढविण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला.
विरोधी पक्षांतील मित्रपक्षांना या प्रस्तावाचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.






