विशाल शिंदे

भोर : तालुक्यातील ससेवाडी येथील डोंगरावरील युनिव्हर्सल कॉलेज परिसरातील उघड्या पाण्याच्या टाक्या वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणी पिण्यासाठी टाक्यांमध्ये येणारे ऊदमांजर, साप आणि इतर वन्यजीव त्यात पडून अडकत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. नुकतेच या टाक्यांमध्ये अडकलेल्या एका ऊदमांजराची सर्पमित्रांनी तत्परतेने सुटका केली.
कॉलेज परिसरात पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या या टाक्या साधारण दहा फूट खोल आणि तीस फूट लांब आहेत. मात्र, या टाक्यांना झाकण किंवा सुरक्षित आच्छादन नसल्याने त्या उघड्या अवस्थेत आहेत. पाण्याच्या शोधात येणारे वन्यजीव या टाक्यांमध्ये पडतात. टाक्यांची खोली अधिक असल्याने आणि बाहेर पडण्यासाठी पायऱ्या किंवा अन्य व्यवस्था नसल्याने त्यांना स्वतःहून बाहेर येणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक वन्यजीवांचा जीव धोक्यात येत आहे.

याच टाक्यांमधून यापूर्वीही ऊदमांजर, साप आणि इतर वन्यजीवांची सुटका करण्यात आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. वारंवार अशा घटना घडत असतानाही टाक्यांना सुरक्षित झाकणे बसविण्यात आलेली नसल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकत्याच झालेल्या बचावकार्यात सर्पमित्र श्रीकांत खेडकर आणि विलास धोंगडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. समीर वाडकर आणि शंकर वाडकर यांनीही या बचावकार्यात मोलाची साथ दिली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून टाकीत अडकलेल्या ऊदमांजराला बाहेर काढण्यात यश आले. श्रीकांत खेडकर आणि विलास धोंगडे यांनी बचावकार्यासाठी विशेष मेहनत घेतली.
याबाबत पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष शंकर वाडकर यांनी कॉलेज प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. टाक्यांना मजबूत झाकणे बसवावीत किंवा वापरात नसलेल्या टाक्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, जेणेकरून भविष्यात कोणताही वन्यजीव त्यामध्ये पडून मृत्युमुखी पडणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.
वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासाठी सर्पमित्रांकडून वारंवार बचावकार्य केले जात आहे. मात्र, प्रत्येक वेळी वन्यजीव टाक्यांमध्ये पडल्यानंतर त्यांची सुटका करण्यापेक्षा अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कॉलेज प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी. तसेच वनविभाग आणि संबंधित प्रशासनानेही पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.






