पुणे : गुगलवर हॉटेल, कुरिअर कंपनी किंवा कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक शोधताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गुगलवरील बनावट मोबाइल क्रमांक आणि फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करत आहेत. पुण्यात अशाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल 10 लाख 85 हजार 614 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. हॉटेल बुकिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची 5 लाख 12 हजार रुपयांची, तर कुरिअरच्या कस्टमर केअरचा क्रमांक शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची 5 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

धायरी फाटा परिसरात राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला महाबळेश्वरमध्ये हॉटेल बुक करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवर हॉटेलची माहिती शोधली. यावेळी ‘कोर्टयार्ड हॉटेल’ची जाहिरात दिसल्यानंतर त्यावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने बुकिंगची माहिती देत विश्वास संपादन केला. त्यानंतर क्रेडिट कार्डची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून आरोपीने त्यांच्या खात्यातून 5 लाख 12 हजार 13 रुपये काढून घेतले.
दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाने पार्सलची माहिती मिळवण्यासाठी डीटीडीसी कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक गुगलवर शोधला. बनावट क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलवर अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मोबाइलचा ताबा मिळवून त्यांच्या खात्यातून 5 लाख 73 हजार 601 रुपये लंपास केल्याचे समोर आले.







