सोलापूर : हुंड्यासाठी होणाऱ्या कथित छळाला कंटाळून सोलापुरातील 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांत तिच्या मृत्यूची नोंद झाली. ज्ञानेश्वरी रोहित जाधव (वय 28, रा. पाथरुट चौक, सोलापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2024 ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्ञानेश्वरीला सासरी त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिचे सासर पुण्यातील वानवडी परिसरातील केदारी नगर येथे आहे. माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी घेऊन यावी, अशी मागणी पती आणि सासरच्या इतर सदस्यांकडून केली जात होती. मागण्या पूर्ण न झाल्याने तिला शिवीगाळ, दमदाटी तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या छळाला कंटाळून ज्ञानेश्वरीने 21 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती रोहित जाधव, सासरे विलास, सासू जयश्री आणि नणंद अश्विनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार पोलिसांनी कारवाई केली.

मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली. पाथरुट चौकातील राहत्या घरी ती बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिचे वडील पांडुरंग यांनी तिला तातडीने अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. तक्रारीतील आरोप आणि मृत्यूशी संबंधित सर्व बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.






