बीड : हवामानाचा अंदाज वर्तवणारे अभ्यासक पंजाब डख यांच्या विरोधात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. डख यांच्या पावसाच्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप धोंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पंजाब डख हे सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या माध्यमातून राज्यातील पाऊस आणि हवामानाबाबत अंदाज व्यक्त करतात. अनेक शेतकरी या अंदाजांवर विश्वास ठेवून पेरणी, फवारणी, पीक काढणी आणि इतर शेतीविषयक निर्णय घेत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, काही अंदाज प्रत्यक्ष हवामानाशी जुळले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा धोंडे यांनी केला आहे.
10 मुद्द्यांवर चौकशीची मागणी

धोंडे यांनी आपल्या अर्जात 10 प्रमुख मुद्दे मांडले आहेत. यामध्ये पंजाब डख यांनी यापूर्वी दिलेल्या हवामान अंदाजांची अधिकृत हवामान विभागाच्या माहितीशी तुलना करून अचूकता तपासण्याची मागणी केली आहे. अंदाज व्यक्त करताना पावसाबाबत निश्चित विधाने केली होती का आणि त्यामध्ये आवश्यक सावधगिरीचा उल्लेख होता का, हेही तपासण्यास सांगितले आहे.
याशिवाय सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ व संदेशांची तपासणी करावी, अंदाजांसाठी कोणत्या वैज्ञानिक माहितीचा आधार घेतला जातो, याची चौकशी करावी, अशी मागणी आहे. या अंदाजांमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा तपशीलही गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आष्टी, पाटोदा, शिरूरसह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून त्यांच्याकडील व्हिडिओ, स्क्रीनशॉट, संदेश आणि शेती खर्चाच्या पावत्यांसारखे पुरावे जमा करावेत, असे धोंडे यांनी म्हटले आहे. तसेच अंदाज प्रसारित करण्यामागील आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक बाबींचीही कायदेशीर पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
या अर्जावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.






