पुणे : शहरातील विकासकामांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कामांमधील अनियमितता रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विकासकामांच्या तपासणीसाठी नवी नियमावली लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही कामाचे अंतिम बिल मंजूर करण्यापूर्वी गुणवत्ता तपासणी आणि दक्षता विभागाची पडताळणी करावी लागणार आहे.

शहरात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच इतर सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. अनेक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचेही समोर आले आहे. या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अधिक कठोर व्यवस्था तयार केली आहे.
नव्या नियमानुसार प्रत्येक विकासकामाची स्वतंत्र बाह्य संस्थेमार्फत म्हणजेच ‘थर्ड पार्टी’ तपासणी केली जाणार आहे. संबंधित काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेणे आवश्यक असेल. ही छायाचित्रे जिओ-टॅग पद्धतीने नोंदवावी लागतील. त्यामुळे काम कुठे आणि कोणत्या टप्प्यावर झाले, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

अभियंत्यांची जबाबदारी निश्चित
कामाचा दर्जा आणि मोजमाप यांची जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर राहणार आहे. कनिष्ठ अभियंत्यांना अक्षांश-रेखांशासह छायाचित्रे नोंदवावी लागतील. त्याचबरोबर मोजमाप पुस्तिकेतील नोंदीही अचूक ठेवाव्या लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करणे बंधनकारक असेल. अतिरिक्त आयुक्तांनीही निवडक कामांची तपासणी स्वतः करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विकासकामाचे अंतिम बिल देण्याआधी दक्षता विभागाकडून तांत्रिक आणि आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. कामात त्रुटी, मोजमापातील गैरप्रकार किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.






