पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका भामट्याने 33 वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्किंगच्या बहाण्याने तिची दुचाकी घेऊन तो पसार झाला. या घटनेत महिलेचे एकूण 1 लाख 37 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संबंधित तरुणाची सुमारे महिनाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि त्यातून मैत्री निर्माण झाली. आरोपीने आपली दगडूशेठ गणपती मंदिरात ओळख असल्याचे सांगितले. तसेच महिलेला गणपतीचे दर्शन आणि पूजा करून देण्याचे आमिष दाखवले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून महिला 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता त्याला भेटण्यासाठी गेली. बुधवार चौक परिसरातील एका हॉटेलसमोर त्यांची भेट झाली. त्यावेळी आरोपीने महिलेची दुचाकी पार्किंगमध्ये लावून आणतो, असे सांगितले. महिलेने विश्वासाने वाहन त्याच्याकडे दिले. मात्र, दुचाकी घेऊन गेलेला तरुण पुन्हा परतलाच नाही.

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये 90 हजार रुपये किमतीची दुचाकी, 40 हजार रुपयांचा मोबाइल आणि 7 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सतर्क राहावे. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून आपले वाहन किंवा मौल्यवान वस्तू त्याच्या ताब्यात देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






