शिरूर: व्याजाने घेतलेल्या पैशांची व्याजासह परतफेड करूनही पुन्हा लाखो रुपयांची मागणी, सततचा वसुलीचा तगादा आणि मानसिक त्रासाला कंटाळून शिरूर (जि.पुणे) येथील संजय बलदोटा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने त्यांच्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याप्रकरणी ऋषभ संजय बलदोटा (वय २८, रा.सैनिक सोसायटी, शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी ऋषभ बलदोटा आणि त्यांचे वडील संजय बलदोटा यांनी काही व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांची व्याजासह पूर्ण परतफेड करूनही संबंधितांकडून आणखी २३ लाख रुपयांची मागणी केली जात होती. तसेच वसुलीसाठी अनोळखी व्यक्तींना घरी पाठवून मानसिक त्रास दिला जात होता. याशिवाय अन्य व्यक्तीकडून घेतलेल्या पैशांच्या व्याजापोटी १२ लाख रुपयांसाठीही तगादा लावला जात असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये ऋषभ बलदोटा यांनी केला आहे.
या प्रकरणी कथित मानसिक छळाला कंटाळून संजय बलदोटा यांनी गुरुवारी (ता.२६) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील पाण्याच्या टाकीजवळ आत्महत्या केली.

दरम्यान, या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी आरोपींची नावे आणि त्यांच्यावरील कारवाईबाबत पोलिसांकडून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचीही परिसरात चर्चा सुरू आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे नेमकी कारवाई काय झाली, आरोपींना अटक झाली का आणि त्यांची नावे का जाहीर करण्यात आली नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.
“संबंधित घटना गंभीर स्वरूपाची असून, याप्रकरणातील काही आरोपी पुणे शहरातले आहेत. तसेच आरोपींची नावे जाहीर केल्यास ते आरोपी दूरपर्यंत पळून जाऊ शकतात. त्यामुळे आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.”
– विनोद पाटील(पोलीस निरीक्षक,शिरूर)







