लोणी काळभोर, ता. 28 : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. संबंधित तरुणाच्या कमरेला पँटमध्ये पाठीमागील बाजूस खोचलेला लोखंडी कोयता आढळून आल्याने पोलिसांनी तो जप्त केला. या कारवाईमुळे कवडीपाट परिसरात रात्रीच्या वेळी धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे.

सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे (वय 21 , रा. गुजरवस्ती, कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश बाळासाहेब खरात यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात कोंबिंग ऑपरेशन आणि गस्त घालत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अमित गोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक गिरी, गणेश खरात आणि सोमनाथ गळाकाटे हे कवडीपाट टोलनाका परिसरात गस्त घालत असताना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांना पाहून तो घाबरल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. अंगझडतीदरम्यान सोमनाथ लोंढे याच्या पँटच्या मागील बाजूस कमरेला खोचलेला लोखंडी कोयता पोलिसांच्या निदर्शनास आला. या कोयत्याचे पाते आतील बाजूस वळवलेले असून, त्याच्या एका बाजूस धार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सुमारे 100 रुपये किमतीचा हा कोयता पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त केला. जप्त केलेला कोयता पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस कायद्यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा
सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याप्रकरणी सोमनाथ उर्फ डच्या लोंढे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 4 (25 ) नुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन आणि गस्तीद्वारे संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.






