शिरूर: शिरूर शहरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील एका ३३ वर्षीय तरुणाला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (ता.२७) रात्री शिरूर शहर परिसरातील रेणुकामाता मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.२७) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांच्यासह पोलीस पथक शिरूर शहरात गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या सूचनेवरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याने आपले नाव गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा.गव्हाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) असे सांगितले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज असून, या कारवाईमुळे अशा प्रवृत्तींना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






