रामगड : झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वर कुजू आऊटपोस्ट हद्दीतील पांकीजवळ स्कॉर्पिओ आणि एका अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या १३ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बेन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगहोरो गावचे रहिवासी होते. हे सर्वजण राजरप्पा मंदिरात दर्शनासाठी जात होते. विवेक कुमार यांच्या पत्नीला शिक्षिकेची नोकरी मिळाल्याने आनंदाप्रीत्यर्थ मंदिरात दर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. विवेक कुमार स्वतः खासगी शाळा चालवतात. वाहनचालक वगळता अपघातातील इतर सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री उशिरा, साधारण पहाटे दीडच्या सुमारास पांकीजवळ स्कॉर्पिओची एका अज्ञात वाहनाशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच कुजू आऊटपोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी आणि इतर प्रवाशांना रामगड सदर रुग्णालयात हलवले.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी १३ जणांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीला पुढील उपचारांसाठी रामगडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच रामगडचे उपायुक्त रितुराज, पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत मदत आणि बचावकार्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, बिहारमधील मृतांच्या नातेवाईकांची प्रतीक्षा केली जात आहे. या भीषण अपघातामुळे जंगहोरो गावावर शोककळा पसरली आहे.






