भोसरी, (पुणे) : गल्लीमधून जाताना घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारल्याने स्वतःला भाई म्हणवणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराने बाप-लेकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत घडली. या हल्ल्यात मुलगा आणि त्याचे वडील जखमी झाले असून, दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारासघडली.

याप्रकरणी स्वप्नील जयद्रथ गायकवाड (वय 20, रा. निरंकार भवन, बालाजीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल सिकंदर रामप्रसाद (वय-19) आणि समाधान बाळू पोतदार (वय 23, दोघेही रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. रात्री दहाच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरासमोरील अरुंद गल्लीमधून जात असताना घराचा दरवाजा वाजला. स्वप्नील यांनी दरवाजा कोण वाजवत आहे, अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी उद्धटपणे उत्तर दिल्यानंतर स्वप्नील यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी बाहेर आलेल्या स्वप्नील आणि त्यांचे वडील जयद्रथ गायकवाड यांना दोघांच्या हातात लोखंडी तलवारी असल्याचे दिसले.

दरवाजा का वाजविला, असा जाब विचारताच समाधान पोतदार याने शिवीगाळ करून स्वप्नील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अमोल रामप्रसाद याने ‘तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे,’ असे म्हणत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील यांनी पहिला वार चुकवला; मात्र त्यानंतर डोक्यावर केलेला दुसरा वार हातावर लागून ते जखमी झाले.
स्वप्नील यांना वाचविण्यासाठी त्यांचे वडील जयद्रथ गायकवाड पुढे आले असता, आरोपीने त्यांच्या हातावरही तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. दोघांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावू लागले. त्यावेळी आरोपीने तलवार हवेत फिरवत शिवीगाळ केली. ‘कोणी मध्ये पडू नका, नाहीतर एकेकाला संपवून टाकीन,’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.
या घटनेनंतर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित पाटील करीत आहेत.






