हडपसर, (पुणे) : हातात कोयते आणि अन्य हत्यारे घेऊन दोन दुचाकींवरून आलेल्या पाच जणांनी मांजरी परिसरात दहशत माजविल्या प्रकरणी पाच जणांवर मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 23 रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान केशवनगर-मांजरी रोडवरील झेड कॉर्नर, कुमार बायोप्लांट परिसरात घडली.

विकी उर्फ बाळू कृष्णा माने (रा. घुलेनगर, गल्ली क्रमांक 2, झेड कॉर्नर, मांजरी), कुलदीप उर्फ कुणाल संजय साळुंखे (रा. मुंढवा, पुणे), रेहान अली हुसेन शेख (रा. ग्रीनवुड सोसायटी, झेड कॉर्नर, मांजरी), अंशुमन मुळे (रा. पांढरेमळा, हडपसर) आणि कार्तिक राजन थेऊरकर (रा. येरवडा, पुणे) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयित पाच जनांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रकाश बेरड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातात कोयते घेऊन काही जण परिसरात फिरत दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर मांजरी पोलिसांनी या घटनेची पडताळणी सुरू केली. तपास पथकाने व्ही.एस.आय. इन्स्टिट्यूट, कुमार बायोप्लांट आणि झेड कॉर्नर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दोन दुचाकींवरून पाच जण सार्वजनिक रस्त्यावर हातातील हत्यारे हवेत फिरवत असल्याचे, तसेच त्यांना पाहून परिसरातील नागरिक घाबरून पळत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या वरील पाच जणांची नावे निष्पन्न केली. या पाच जणांनी सार्वजनिक ठिकाणी गैरकायदेशीर जमाव जमवून हातातील हत्यारे हवेत फिरवली आणि पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे करीत आहेत.






